पुणे येथे सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्ध बहुजनांचा एल्गार
अमोल तुजारे :पुणे येथे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पुणे शहराच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बहुजन साहित्य-कला अकादमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे, तेजधार न्यूज.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुणे मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मध्ये बहुजन साहित्य-कला व सांस्कृतिक संघर्ष जाहीर चर्चा सत्रात सांस्कृतिक वर्चस्वाविरुद्ध बहुजनांचा एल्गार
बहुजन समाजाच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक वैभवाला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या बहुजन साहित्य-कला अकादमी या नवगठित सांस्कृतिक संघटनेचा उद्घाटन समारंभ पुण्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. (डॉ.) सुरेश माने सर, उद्घाटक म्हणून ज्येष्ठ विचारवंत मा. जी. के. ऐनापुरे, प्रमुख वक्ते म्हणून धम्मध्वज वाहणारे धम्मकीर्ती महाराज परभणीकर आणि ज्येष्ठ आंबेडकरी अभ्यासक सुरेश केदारे हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना अध्यक्ष ॲड. सुरेश माने यांनी स्पष्ट केले की, “थोपवलेल्या ब्राह्मणी सांस्कृतिक वर्चस्वाच्या विरोधात प्रतिकूल वातावरणात उभ्या राहिलेल्या बहुजन संस्कृतीला आज नवसंजीवनी देण्याची गरज आहे. त्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांचा सांस्कृतिक पुनर्पाठ करणे अत्यावश्यक आहे.”
उद्घाटक जी. के. ऐनापुरे यांनी सांगितले की, “साहित्य आणि कला या केवळ सौंदर्यनिर्मितीचे माध्यम नसून त्या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याच्या प्रभावी शस्त्रं आहेत. बहुजन समाजाची सांस्कृतिक अभिव्यक्ती ही संघर्षाचीच भाषा आहे.”
धम्मकीर्ती महाराज परभणीकर यांनी बुद्धाच्या धम्मपरंपरेचा सांस्कृतिक वारसा अधोरेखित केला, तर सुरेश केदारे यांनी “बहुजनांच्या कलेचे रूप हे त्यांच्या दुःख-आशा-लढ्याचे प्रतिबिंब आहे, त्याचा अपमान न करता ती उजळवण्याची गरज आहे” असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमात अनेक नव्या लेखक, कलाकार, अभ्यासक यांचा सहभाग लाभला. “बहुजन साहित्य-कला अकादमी” ही संस्था फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या आधारावर साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीला नवे आयाम देण्याच्या उद्देशाने कार्य करणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिबर्टी पब्लिशिंग हाऊसचे संपादक पंकज चाळके यांनी केले असून आभार प्रदर्शन संभाजी कांबळे यांनी केले असून कार्यक्रमासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पुणे शहर अमोल तुजारे तसेच अॅड. अंबादास बनसोडे, अभय शेलार, धीरज बगाडे यांनी पुढाकार घेतला.



