तेजधार
रवींद्र महाजनी यांचे निधन : तळेगावात बंद खोलीत आढळला मृतदेह; दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा पोलीसांचा अंदाज
पानिपत शेवटचा चित्रपट
पानिपत (२०१९) हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यात त्यांनी मल्हारराव होळकर यांची भूमिका केली होती. याशिवाय त्यांनी गुजराती चित्रपटामध्ये सुध्दा काम केले होते. अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही त्यांनी भूमिका बजावली.
१९९९ च्या दरम्यान ते पुण्यातील कोथरूड मध्ये राहत होते त्यानंतर अलिकडच्या कालखंडात तळेगाव परिसरात वास्तव्यास होते.
मराठीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी (वय ७७) यांचे निधन झाले. मावळ तालुक्यातील आंबे येथे एका बंद खोलीत शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास मृतदेह आढळून आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते.
दरम्यान, शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलीसांना कळवले त्यांच्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलीसांनी घरात प्रवेश केला तेव्हा पोलीसांना महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवले आहे. अल्प परिचयमराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे आणि चित्रपटांचा प्रवाहही बदलायला लावणारा रूबाबदार आणि देखणं असे व्यक्तिमत्व म्हणजे रविंद्र महाजनी.
हिंदीतही पदार्पण मात्र…
मराठीतील अतिशय देखणा अभिनेता अशी त्यांची ओळख बरीच वर्ष कायम होती. रंजना, प्रिया तेंडुलकर, उषा नाईक अशा अनेक अभिनेत्रींबरोबर त्यांनी कौटुंबिक मराठी चित्रपट केले, शहरी व ग्रामीण भागाच्या भूमिका ते नेहमी साकारत गंभीर व विनोदी अशा दोन्ही व्यक्तीरेखामध्ये त्यानी ताकतीने काम केले. अशोक सराफ यांच्याबरोबरच्या त्यांच्या भूमिका गाजल्या. मराठीत आघाडीवर असताना त्यांनी हिंदी चित्रपट सुष्टीतही पदार्पण केले. मात्र त्यांची चित्रपटाची निवड चुकली. बेअब्रू नावाचा एक सी ग्रेड चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांना हिंदीत गेले म्हणून मराठीत काम मिळाले नाही व मराठी आहे म्हणून हिंदीतही त्यांचे नाणे चालले नाही. नंतर त्यांनी काम थांबवले व बांधकाम व्यवसायात लक्ष घातले.
बालपणापासून आवड महाजनी यांचा जन्म बेळगावचा, त्यांचे वडील ह. रा. महाजनी हे जेष्ठ पत्रकार. बालपण मुंबईत. अभिनयाची आवड लहानपणापासून नाटकात चित्रपटात शाळेच्या संमेलनात काम. खालसा महाविद्यालयात बी.ए. शिक्षण पुर्ण झाल्यावर रविंद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी दिली.
१९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. त्यानंतर “आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं” देवता” मुंबईचा फौजदार’,’गोंधळात गोंधळ’असे चित्रपटही गाजले. तसेच बेलभंडार’, ‘अपराध मीच केला’ या नाटकांचे प्रयोग केले सन १९९० नंतर चरित्र भूमिका, दूरचित्रवाणी मालिकांमध्येही आणि ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी निर्मितीच्या आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात प्रवेश केला. २०१५ नंतर त्यांनी’ काय राव तुम्ही’, कॅरी आॅन मराठा’ ‘देऊळ बंद” ‘पानीपत’ अशा काही चित्रपटांतूनही भूमिका साकारल्या.



