पिंपरी चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाचे केले तडकाफडकी निलंबन
गुन्ह्यातून आरोपीचे नाव वगळणे पडले महागात; पिंपरी चिंचवड पोलीस उपनिरीक्षकाचे केले तडकाफडकी निलंबन

सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला चढवला. ही घटना रविवारी (दि. २२) काळेवाडी येथे घडली. दरम्यान, शहरातील एका बड्या नेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळले. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ बेड्या ठोकण्याचे आदेश दिले.
सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला चढवला. ही घटना रविवारी (दि. २२) काळेवाडी येथे घडली. दरम्यान, शहरातील एका बड्या नेत्याने स्थानिक पोलिसांवर दबाव टाकल्याने सराईत गुन्हेगाराचे नावच गुन्ह्यातून वगळले. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी संबंधित गुन्हेगाराला तत्काळ बेड्या ठोकण्याचे आदेश दिले. तसेच, राजकीय दबावाला बळी पडणाऱ्या पोलीस उप निरीक्षकाचे तडकाफडकी निलंबनदेखील केले.
नेमके काय आहे प्रकरण?
या प्रकरणातील आरोपी प्रशांत दिघे हा पिंपरी- चिंचवड शहरातील एक कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, हत्यारबंदी, जबरी चोरी यांसारखे १९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. रविवारी (दि. २२) रात्री काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये आरोपीने एका व्यक्तीचा खून करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस उप निरीक्षक सचिन चव्हाण यांनी त्याचे नाव गुन्ह्यातून वगळले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचे स्वागत
या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत चव्हाण यांना निलंबित केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला न जुमानता कठोर पावले उचलल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लोकप्रतिनिधीकडून आरोपांच्या फैरी
आपण सांगूनही कारवाई केल्याचा राग आल्याने संबंधित लोकप्रतिनिधीने पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच, पोलीस हप्तावसुली करत असल्याचेही जाहीररीत्या सांगितले. मात्र, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव झुगारल्याने आरोप होत समोर आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.



