नांदेड : तेजधार न्यूज.
राहुल गांधी यांच्या पद यात्रेत आज युवा सेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. अनेकांच्या नजरा राहुल आणि आदित्य भेटीकडे लागल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे रॅलीत सहभागी होणार हे शिवसेनेच्या वतीने जाहीर करण्यात आले होते.
आज सायंकाळी पावणे पाच वाजता यात्रा सुरू होण्याच्या आधी आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा ताफा राहुल गांधी यांच्या कॅम्पमध्ये येऊन पोहचला. आदित्य ठाकरे यांच्या सोबत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील होते.
आदित्य ठाकरे कॅम्पमध्ये आले त्यावेळी राहुल यांची यात्रेची तयारी सुरू होती. आदित्य येताच राहुल गांधी यांनी उभे राहत आदित्य ठाकरे यांना कडाडून मिठी मारली. कधी आलात? वडील कसे आहेत? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर लगेच एका गाडीने राहुल गांधी सभेकडे निघाले.
या गाडीत राहुल गांधी पुढे आणि आदित्य ठाकरे मागच्या सीटवर बसले होते. गाडीचा ताफा यात्रेच्या दिशेने निघाला. यात्रेत राहुल आणि आदित्य दोघेही सहभागी झाले. पाच ते सात मिनिट चालल्यानंतर आदित्य ठाकरेंनी यात्रेतून निरोप घेतला. एकूण काय तर पांधरा ते वीस मिनिटात आदित्य ठाकरे यांनी आपला दौरा आटोपता घेतला.
राहुल यांच्या यात्रेत सहभागी होण्याचा आदित्य ठाकरे यांचा योग्य निर्णय आहे. राजकारण बदलतंय, शिवसेना अधिक व्यापक होते, महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकारणाचं हे चित्र. लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. जुने जाऊ द्या मरणालागुनी, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी दिली.
राहुल आणि आदित्य यांच्या एकत्रित येण्याने सोशल मीडियात हा विषय चर्चेचा राहिला. युवक काँग्रेसने ‘अन्याय के ख़िलाफ़ हम एक हैं, हक़ के लिए मिल कर आवाज़ उठाएंगे, कंधे से कंधा मिलाएंगे’ अशा ओळी देत भेटीचा फोटो ट्विट केला.



